पाणी पुनर्वापराची गरज.

सध्या  पाण्याची अवस्था फारच बिकट होत चालली आहे. दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे, पण त्या प्रमाणात पाणी पुरवठा होऊ शकत नाही.

यामागील मुख्य कारणे म्हणजे झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण, शिक्षणसंस्था, ऑफिसेस आणि सार्वजनिक ठिकाणी होणारा पाण्याचा वापर. तसेच शेतीसाठी आणि आग विझवण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते.

दरवर्षी आपण पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे पाऊस कमी झाल्यास तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासोबतच पाण्याचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ज्यामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे.

म्हणूनच आता पाण्याचा योग्य वापर, पाण्याचे प्रभावी नियोजन आणि सांडपाण्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.

पाण्याचे स्रोत मुख्यतः दोन प्रकारचे असतात. जमिनीवरील स्रोतांमध्ये नद्या, नाले, धरणे, कालवे आणि तळी यांचा समावेश होतो. तर जमिनीखालील स्रोतांमध्ये बोअरवेल, विहिरी यांचा समावेश होतो.

ही सर्व स्रोत वर्षानुवर्षे अस्तित्वात आहेत. मात्र, वाढत्या मागणीमुळे पाण्याचा पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठे अंतर निर्माण होत आहे.

हे अंतर कमी करायचे असेल, तर आपल्याला नवीन पर्याय शोधावे लागतील. आणि सध्या सर्वात प्रभावी पर्याय म्हणजे पाण्याचा पुनर्वापर होय.

आपल्या घरांमधून स्वयंपाकघर, बाथरूम आणि टॉयलेटमधून जे पाणी बाहेर पडते, त्याला सांडपाणी ( Sewage ) असे म्हणतात.

हे सांडपाणी सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये नेले जाते आणि त्यावर विविध प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा नदीमध्ये सोडले जाते.

परंतु, जेवढे सांडपाणी तयार होते तेवढ्या प्रमाणात प्रक्रिया करण्यासाठी पुरेसे ट्रीटमेंट प्लांट उपलब्ध नसल्यामुळे, काही ठिकाणी हे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडले जाते.

यामुळे नदी प्रदूषणाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच कारखान्यांमधील वेस्ट वॉटरही नदीत सोडले जात असल्याने प्रदूषणात आणखी भर पडत आहे.

यावर उपाय म्हणजे घरगुती सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी एसटीपीची व्यवस्था करणे आणि कारखान्यातील सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी ईटीपीची उभारणी करणे.

एसटीपी प्रकल्पामध्ये स्क्रीनिंग, ऑइल व ग्रीस  रिमूव्हल, ग्रिट रिमूव्हल, प्रायमरी सेडिमेंटेशन, एरेशन, सेकंडरी सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन आणि डिसइन्फेक्शन अशा विविध प्रक्रिया केल्या जातात.

या प्रक्रियेनंतर तयार झालेले पाणी पुनर्वापरासाठी वापरता येते, जसे की फ्लशिंग आणि गार्डनिंग.

यामुळे जे पाणी थेट नदीमध्ये सोडले गेले असते, त्याचा योग्य पुनर्वापर करता येतो. परिणामी नदी प्रदूषण कमी होण्यास मदत होते आणि पाण्याची मागणी व पुरवठा यामध्ये संतुलन राखता येते.

आता बहुतेक सोसायट्यांमध्ये एसटीपी उभारण्यात आलेले आहेत, तसेच कारखान्यांमध्ये ईटीपीही कार्यरत आहेत.

परंतु आता एक नवीन समस्या निर्माण होत आहे, ती म्हणजे कुशल ऑपरेटर्सची कमतरता. म्हणजेच एसटीपी आणि ईटीपी उभारलेले असले तरी ते योग्य प्रकारे चालवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही.

त्याचप्रमाणे, एसटीपी आणि ईटीपीबाबत समाजामध्ये पुरेशी जागरूकता नाही. प्रत्यक्षात या क्षेत्रामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात नाही.

म्हणूनच या क्षेत्राबाबत प्रशिक्षण देणे आणि व्यापक जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.

तसेच एसटीपी आणि ईटीपी उभारण्यासाठी आवश्यक तेवढी जागा आणि त्यासाठी लागणारा खर्च याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

आता समुद्र हा देखील एक महत्त्वाचा पाण्याचा स्रोत म्हणून पुढे येत आहे. समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी डीसेलिनेशन प्लांट्सची संख्या वाढवावी लागेल.

जमिनीखालील पाण्यामध्ये हार्डनेस जास्त असल्यास, त्यावर सॉफ्टनरद्वारे प्रक्रिया करावी लागते. तसेच पाण्यामध्ये टीडीएस जास्त असल्यास, आरओ (Reverse Osmosis) प्रक्रियेचा वापर करून पाणी शुद्ध करता येते.

या सर्व ट्रीटमेंट प्लांट्ससाठी पाण्याचे विश्लेषण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार pH, TDS, हार्डनेस, BOD, COD, DO, बॅक्टेरिया, TSS, कलर आणि ओडर हे सर्व वॉटर क्वालिटी पॅरामिटर्स  दिलेल्या निकषांनुसार राखणे गरजेचे आहे.

चल तर मग, पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सर्वप्रथम याबाबत जागरूकता निर्माण करूया.

एसटीपी, ईटीपी, आरओ आणि सॉफ्टनर यांच्या प्रक्रिया समजून घेऊया आणि या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करून बेरोजगारी कमी करूया.

हे सर्व केल्यास नक्कीच पाणी प्रदूषण कमी होईल, आजारांचे प्रमाण घटेल, पाण्याचा योग्य वापर करता येईल आणि पाण्याचे प्रभावी नियोजन करता येईल.

 

प्रशांत वाळके

एआयएसएसएमएस  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग

पुणे