“मोहीम: नेतृत्व गुणांच्या संवर्धनाची!”
(ऑन टास्कफोर्स ऑफ आशिया पॅसिफिक लीडरशिप प्रोग्रॅम !)
“शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, जे आपण जग बदलण्यासाठी वापरू शकता” असे नेल्सन मंडेला यांनी म्हटले आहे.
जग हे खूप आश्चर्यकारक असे बुक आहे. ते वाचायचे आणि शिकायचे असेल तर जगभर प्रवास करावा लागतो! माझ्या सासूबाई एक उत्तम शिक्षिका होत्या त्या मला नेहमी म्हणायच्या “मंगल तू खूप हुशार आहेस. तुला मी १०१ टक्के मार्क्स दिलेत. ‘चूल आणि मूल’ या मध्ये तू रमू नयेस! ते तर सर्वच मुली करतात! तू जगभर फिर आणि तुझ्या ज्ञानाचा साठा वृन्धीगत कर!” आणि मी नेहमी नेल्सन मंडेला व माझ्या सासुबाईचं हे बोलणं लक्षात ठेवूनच वागत असते. या मध्ये थोडी भर घालते ते आई वडिलांच्या संस्काराची! ज्ञान हे उत्तम दान आहे! जे जे आपल्याला माहित आहे ते ते सकाळ जनांसी सांगावे!. आपण दुसर्यांना काहीही दिले आणि त्यांना त्याचा फायदा झाला तर आपल्याला हि नक्कीच या ना त्या रूपात फायदा होतो! अलीकडे नेमके याच्या उलटेच सर्वठिकाणी दिसून येते. आपल्याला जे मिळाले ते इतराना मिळू नये हीच भावना जोपासली जाते. मला मात्र आई व वडीलांच्या या संस्काराचा खरा अर्थ कळाला आहे! जीवन जगण्याचा तो मंत्रच आहे म्हणाना! त्यामुळेच मला मिळालेल्या ह्या आगळ्या वेगळ्या प्रशिक्षणाची सर्वांनां माहिती दयावी अशी इच्छा मनात आली. कारण जे जे मी शिकत असते ते ते माझ्या सहकार्यांना, नातलगांनां आजू बाजुंच्या सर्वांनां सांगण्याची माझी प्रवृत्ती आहे. त्यातील एक दोन जणांनी देखील ते आत्मसात केले तर मला याचा खूप आनंद होतो! पण आता हा कोर्से मी लांब रजेवर व तसेच अमेरिकेत २-३ महिने असताना करणार त्यामुळे काय करावे असा विचार येताच लेख लिहण्याचे सुचले.
अमेरिकेच्या ईस्ट वेस्ट सेण्टरच्या ह्या चार महिन्यांच्या कोर्से चे नाव आहे ते ‘आशिया पॅसिफिक लीडरशिप फेलोशिप प्रोग्रॅम’ हा २०१९ चा असल्याने त्याला “जनरेशन-१९” असे हि संक्षिप्त नाव आहे. अमेरिकेचे ईस्ट-वेस्ट सेंटर हे यू.एस. कॉंग्रेसने १९६० मध्ये स्थापन केलेले असून हे केंद्र संशोधन, सहकारी अभ्यास, आणि संवादाद्वारे आशिया, अमेरिका, आणि पॅसिफिकमधील लोक आणि राष्ट्रांमधील संबंध आणि समृद्धीस प्रोत्साहित करते. सर्वसाधारण चिंतेच्या गंभीर मुद्द्यांवरील माहिती आणि विश्लेषणाचे संशोधन करून, लोकांना कौशल्य तयार करण्यासाठी, एकत्रितपणे मतांचे आदानप्रदान करण्यासाठी, आणि धोरणात्मक पर्याय विकसित करण्यासाठीचे काम हे केंद्र करते. ही एक स्वतंत्र, सार्वजनिक, ना-नफा संस्था आहे जी यू.एस. सरकारच्या निधीतून आणि खासगी संस्था, व्यक्ती, फाउंडेशन, कॉर्पोरेशन आणि या प्रदेशातील सरकारे पुरवित असलेला अतिरिक्त फंडातून काम करते. जवळ जवळ गेली साठ वर्षे हे केंद्र विविध प्रकारचे प्रशिक्षण देत असून त्यासाठी फेलोशिप जाहीर करत असते. ज्यांना आवड आहे त्यांनी जरूर त्याचा फायदा घ्यावा.
ईस्ट-वेस्ट सेंटर, हवाई, अमेरिका
सहायक प्राध्यापक डॉक्टर सौ. मंगल हेमंत धेंड
[डिप्लोमा, बी. ई., एम ई, पी. एच. डी. (विद्युत अभियांत्रिकी), अडवान्सड डिप्लोमा इन कॉम्पुटर सॉफ्टवेअर, सीसटीम अनालिसिस अँड अँप्लिकेशन्स]
पुण्यातील प्राध्यापक डॉक्टर सौ. मंगल हेमंत धेंड या गेली २७ वर्षे ऑल इंडिया श्री. शिवाजी मेमोरियल सोसायटी या एकाच संस्थेच्या कॉलेज ऑफ इंजिनीरिंगमधील मध्ये कार्यरत असून त्यांचे नुकतेच अमेरिकेच्या ईस्ट वेस्ट सेंटर, हवाई ह्या प्रसिद्ध रिसर्च सेंटर तर्फे “आशिया पॅसिफिक लिडरशिप प्रोग्रॅम” या चार महिन्यांच्या आगळ्या वेगळ्या ट्रैनिंग कोर्सेसाठी निवड झाली असून त्या लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहेत. त्यांना ह्यासाठी अमेरिकेकडून फेलोशिपहि देण्यात आली आहे. सोळा देशांमधून व विविध वयोगटामधून, प्रोफेशन मधून निवड करण्यात आलेल्या २५ जणांपैकी त्या एक आहेत. भारत आणि परदेशात मैत्री भाव,शांतता, समजूतदारपणा व सहकार्य वृद्धिगत व्हावे म्हणून हि फेलोशिप त्यांना मिळाली आहे. आपल्या प्रमाणेच जास्तीत जास्त जनसमुदयायाला ह्या प्रशिक्षणाची ची माहिती मिळून त्यांना हि स्वतःचे कौशल्य व नेतृत्व गुण सुधारण्याची संधी व लाभ मिळावा ह्यासाठी त्यांनी प्रस्तुतचे साप्ताहिक ब्लॉग लिहण्याचे सुरु केले आहे. हा लेख नक्कीच सर्वांना माहिती दायक, प्रोत्साहन देऊन स्व:गुणांचा व नेतृत्वाचा विकास साधणारा ठरेल यात शंका नाही!
जनरेशन-१९ ची टीम ही भारतातील ३, म्यानमारचे ३. अफगाणिस्तातील ३, चायना, अमेरिका, नेपाळ व फिलिपाईनचे प्रत्येकी २, तर ब्राझील, भूतान, कंबोडिया, इराक, जपान, मलेशिया, व्हिएतनाम मंगोलिया व इंडोनेशियातील प्रत्येकी १ अशी २६ जणांची भौगोलिक प्रदेश, वयोगट, सांस्कृतिक व उद्योगधंदा यांच्या विविधतेने नटलेली आगळी वेगळी आहे. सुरवातीपासूनच मला अंतर्देशीय विविधता, संस्कृती वेगवेगळ्या क्षेत्रातील सहायक प्रशिक्षणार्थी ह्यांच्या बरोबरचे शिक्षण कसे पार पाडणार याची कुशंका मनात वसली आहे. मी तसे आत्तापर्यंत ५ देशात माझ्या रिसर्च कामाचे सादरीकरण केले आहे. गेल्या वर्षी एकटीनेच यूकेचा प्रवास केला असला तरी अजून माझा धीटपणा हा ‘आंतरदेशीय एकटीचा प्रवास व मिळून मिसळून उल्लेखनीय काम करणे’ यासाठी परिपक्व झाला नाही असे वाटते व त्यासाठीच आता काही तरी केले पाहिजे हा मनाशी चंग बांधूनच मी फेलोशिप साठी जानेवारीपासूनच अर्ज करत होते व आता अंतर्देशीय उपक्रमातील आपली भीड चेपलीच पाहिजे असे ठरवूनच मी ‘आशिया पॅसिफिक लीडरशिप फेललोशिप प्रोग्रॅम’ या उपक्रमाला २० जानेवारी २०१९ रोजी, ८ पानी सविस्तर अर्ज दाखल केला होता. या साठी चे लागणारे शिफारस पत्रही मला अगदी सहजपणे माझे माजी प्राचार्य डॉक्टर प्रदीप माने यांच्याकडून व माझ्या रिसर्च क्षेत्रातील तज्ञ यांकडून माझ्या गुणांबद्दल व कामाच्या क्षमतांबद्दल दणदणीत मिळाले होते. त्यामुळे त्यांचे आभार मला मनपूर्वक मानावे वाटतात. इथेही मग मी त्यांच्या एम्प्लॉयीज ना या व इतर उपक्रमासाठी अर्ज देण्यास लावला होता. मला मिळाले नाही तर त्यांना तरी मिळावे ही भावना! पण त्यांची निवड होऊ शकली नाही. त्यानंतर ८ मार्चला जवळ जवळ एक सव्वा तास माझी स्काइपद्वारे मुलाखत घेतली गेली होती. ती इतकी उत्कृष्ट झाली होती कि माझी निवड नक्कीच होणार याची मला खात्री वाटली! त्यामुळे लगेचच मी आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय बोरमाने व संस्थेचे सेक्रेटरी श्री. मालोजी राजे छत्रपतींना त्यातील थोडी क्लिप पाठवली होती. त्यामुळेच त्यांना ह्या उपक्रमाची, ते घेण्यामागची माझी भूमिका, त्याचा माझ्या संस्थेला, कॉलेजला, सहकार्यांना व जनसमुदयायला मला कसा लाभ करून द्यायचाआहे याची तनमळ कळाली होती त्यामुळे मला रजा मिळताना काहीच त्रास झाला नाही! मुलाखतीत विचारलेले प्रश्न व त्यांची मी दिलेली उत्तरे हे सर्व मलाच आश्यर्य चकित करून गेले! या मुलाखतीतूनच मला “माझा विकास झाला आहे” असे ही वाटू लागले. व त्याबरोबरच माझ्यातीलाच काही गुणांचा मला उलगडा झाला! नुसत्या मुलाखतीही खूप काही शिकवून व स्वत:बद्दल विचार करण्यास लावून जातात प्रकर्षाने जाणवले तसेच सिद्धही झाले! प्रश्न होते चांगल्या लीडरची वैशिष्ठे काय? तुमच्यात यातील कुठले गूण आहेत? त्यानंतर काही लीडरचे त्यांनी प्रॉब्लेम्स सांगितले व त्यावर तुमचे मत काय आहे असे विचारले. हे सर्व ही प्रॉब्लेम्स मी खूप काही पर्याय देऊन सोडवले जाऊ शकतात व ते कोणते हे सांगितले. उदाहरणार्थ काही लीडर्स म्हणतात, पुढील निर्णय अचूकतेने घेण्यासाठी, डायरीत ठराविक नोंद करणे याचे महत्व कळते पण स्वतःचेच अक्षर काळात नाही, लिहण्यास वेळ नसतो, एका जागी संकलित होत नाही वगैरे वगैरे! मी मग या सर्व अडचणींना अनेक पर्याय दिले. आपण मोबाइलमध्ये इलेक्ट्रॉनिक डायरीचा वापर करू शकतो. त्यावर टाईप करायचे असल्याने अक्षराची अडचण येत नाही! वेळेचा प्रश्न असेल तर आपण आपल्या आवाजात रेकॉर्ड करावे. रोज रात्री झोपताना दिवसभरातील नोंदी अवघ्या २-३ मिनिटांमध्ये आपण चिरकाल ठेवू शकतो. (आमच्या कॉलेजच्या मिटींग्स मध्ये फक्त मीच हा वापर करताना दिसते!) एवढेच नव्हे तर ठराविक घडलेल्या घटनांची, सूचनांची, इतरांनी दिलेल्या सल्ल्याची या यासारख्या नोदीं कशा करायच्या, या टिपणांचा वापर कसा करायचा, त्या कश्या पद्धतीने करायच्या, त्यांनी आपल्या कामांचा वेग व यश कसे वाढते हे मी उदाहरणासहित पटवून दिले. अश्याच पद्धतीने मला सध्याच्या विद्यार्थ्यांच्या मनधरणी बदल, त्यांच्या यशाच्या कल्पना, व्याख्या यावर मते विचारली. मला सर्वात जास्त मजा आली ती ‘प्रश्न महत्वाचा कि उत्तर महत्वाचे?’ हे सांगताना! मी उत्तर दिले, “प्रश्न ही शोधांची जननी आहे. हे उत्क्रांती करू शकतात! आणि मग मी माझ्या विद्यर्थ्यांना शिकवताना कशी उत्तरे देण्यास लावते व ती चुकीची असतील तरी चालतील असे सांगून इतर मुलांनां त्यावर प्रश्नच विचारायला कसे सांगते व त्या चुकीच्या उत्तरांचे स्पष्टीकरना कशा सर्व संकल्पना सर्वांनाच समजतात याचे उदाहरण दिले. मी हे ‘विचारमंथन'(brain storming) खेळ वर्गात खेळून घेते व ते माझे अवघड अभ्यासक्रम शिकवण्याचे आवडते तंत्र आहे! हे हि मी खूप उकृष्ट पद्धतीने सांगू शकले. या मुलाखतीचे अनुभव ही माझ्या मित्र मैत्रीणीना व माझ्या क्लास मधील मुलांना सांगितले. ही ‘जीवनमूल्य’ शिकवणे मला खूप महत्वाचे वाटते. माझे व्यवस्थापन कौश्यल्य‘हे खूप चांगलेच आहे’ अशी ख्याती होतीच! पण मला ते अजूनही खूप चांगले आहे याचा उलगडा या वेळेस झाला! व ही मुलाखतही मला खूप काही समाधान आणि अपार आनंद ही देऊन गेली! माझ्या मित्र मैत्रीणीना मुलाखतीचे रेकॉर्डिंग्स ही मी दिले. मी ते पहिल्यांदा ऐकले व आपण कुठे कमी पडलो, तिथे काही सुधारू शकतो का व कसे याची ह्याची ही मनात नोंद ठेवली. हे रेकॉर्डिंग ऐकताना माझ्या मनाला एक गोष्ट खूप यातना देऊन गेली! माझ्या आजूबाजूचे सहकारी खूप मोठ्या मोठ्याने बोलल्याने रेकॉर्डिंग्स मध्ये आले होते! मी हेड फोन लावल्याने याची कल्पना हि मला आली नव्हती! मी सकाळीच त्यांना मुलाखतीबद्दल सांगितल्याने, मला दिला गेलेला हा मुद्दामच त्रास वाटला. पण माझ्या एका सहकार्याने लोकांनां वेळीच माझे काही वेगळे चालू आहे त्यांना इथे त्रास देऊ नका सांगितल्याने नंतरचे रेकॉर्डिंग चांगले होते. माझी मैत्रीण म्हणाली तू वाईट वाटून घेऊन नकोस उलट असा विचार कर कि या गोंगाटातही ही, तू किती मग्न होऊन उत्तर दिलीत, ‘असा ते विचार करतील’, असा तू विचार कर! हो पॉझिटीव्ह थिंकिंग चे महत्व अपार आहे! मला याची सवय असल्याने मी हि तसाच विचार केला! आणि मग मलाही अगदी तसाच अनुभव आला! मनातील आपल्या विचारांची ही अफाट शक्ती आहे! विचारांच्या सामर्थ्याने आपण आपल्या जीवनात क्रांती घडवू शकतो! हे असे खूप काही वेगळे अनुभव, अंतर्देशीय स्तरावर काम करताना येतात. आपल्याकडे कोणी म्हटले असते एवढे हि त्यांना काळात नाही का? पण त्यांनी माझ्या उत्तरांनां महत्व्व दिले! मी कॉलेज मधेच मुलाखत देत आहे व तेही नैसर्गीक वातावरणात हे त्यांनी चांगलेच समजून घेतले असावे! हा प्रशिक्षण कोर्स मनलावून करायचा आहे, या निश्चयानेच मी ५ महिने बिनपगारी रजा काढली आहे. जगाच्या पाठीवरील भ्रमण, आगळया वेगळ्या टीम मध्ये राहून ‘लीडिंग द लीडर्स’ कौशल्याचे विकास करून काहीतरी उदात्त करण्याचा संकल्प ह्यामुळे मी हे करू करू शकत आहे. हा प्रोग्रॅम चार टप्प्यांमध्ये आहे. पहिला आहे तो ‘बेस कॅम्प’ चेन्नई येथे. दुसरा आहे तो ऑनलाइन. व तिसरा आहे तो अमेरिकेमध्ये! शेवटचा भाग हा पर्यायी आहे. सध्याच्या आणि सर्व माजी विद्यार्थी बरोबर, सहयोगी कामे करून त्याचा अहवाल २०२० च्या कार्यक्रमात उपस्थित राहून द्यायचा. हा प्रोग्रॅम अमेरिकेतील प्रख्यात संस्थेने आयॊजीत केला असल्याने तो खूपच आखीव- रेखीव, सुसंयोजित व सूत्रबद्धतेनं निर्माण केला आहे. कोर्स सुरू होण्याअगोदरच खूप वेळ द्यावा लागला व तसेच अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या व मिळत आहेत. कोर्स मध्ये प्रवेश करतानाच ‘पाच हि मिनिटे कशातच उशीर अथवा अनुपस्थिती चालणार नाही’ असा करार करून घेण्यात आला आहे. अमेरिकेकडून वक्तशीरपणा हा सर्वच बाबीत चोख दाखवला जातो. हे मी त्यांनी केलेल्या अनेक प्रकारच्या टिप्स, लेखी व इंटरनेटद्वारे केलेल्या संभाषणातून, मला मी त्यांना विचारलेल्या प्रश्नांच्या मिळालेल्या त्यांच्या उत्तरामधून शिकले. खरेच भारतीयांनी यांचे थोडे तरी घेतले पाहिजे! आपण अजूनही ऑन लाईन संवादांना तत्परता दाखवत नाही हि शोकांतिकता आहे!
Written By,
डॉक्टर सौ. मंगल हेमंत धेंड
www.drmangal.com
९४२०६९६४९३, mangaldhend1@gmail.com